Sunday, April 28, 2024
Homeक्राईम न्यूजराज्यातील १२० कारखान्यांचा पट्टा पडला; अद्याप ८७ ठिकाणी गळीत हंगाम सुरूच

राज्यातील १२० कारखान्यांचा पट्टा पडला; अद्याप ८७ ठिकाणी गळीत हंगाम सुरूच

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्यातील १२० साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. या सर्व कारखान्यांचा यंदाचा ऊस गळीत हंगाम संपला असून यामध्ये सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. राज्यातील ८७ साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम अद्याप सुरू आहे. या कारखाना क्षेत्रातील ऊस संपेपर्यंत हे कारखाने सुरू ठेवले जाणार असल्याचे बुधवारी (ता. २८) राज्याच्या साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.

यंदाचा ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील यंदाच्या गळीत हंगामाला आता साडेचार महिने पूर्ण झाले आहेत. सध्या सुरू असलेले उर्वरित सर्व साखर कारखाने हे त्या-त्या कारखान्याच्या क्षेत्रातील ऊस संपेपर्यंत सुरू राहणार आहेत. महाराष्ट्रात सहकारी व खासगी मिळून एकूण २११ साखर कारखाने आहेत. एकूण कारखान्यांमध्ये १०६ सहकारी आणि १०५ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.

यंदाच्या गळीत हंगामात एकूण कारखान्यांपैकी १०३ सहकारी आणि १०४ खासगी असे एकूण २०७ साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले होते. चार कारखाने यंदा उसाचे गाळप सुरू करू शकले नाहीत. दरम्यान सुरु झालेल्या कारखान्यांपैकी १२० कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप पूर्णपणे संपले आहे.

ऊस गळीत हंगाम संपलेल्या प्रमुख कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे, साखर कारखाना, चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना, गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलावडे, उदयसिंहराव गायकवाड, सदाशिवराव मंडलिक (सर्व सहकारी) आणि अथनी शुगर इको केन एनर्जी, सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी (सर्व खासगी) आदी कारखान्यांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील बिजवडी (ता. इंदापूर) येथील कर्मयोगी शंकरराव पाटील, रेडणी (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी, पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील बारामती अॅग्रो आदींसह प्रत्येकी दोन सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम संपला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments