Tuesday, May 7, 2024
Homeक्राईम न्यूजआत्याबाईला मिशा असत्या तर, यावर उत्तर द्यायचे नसतेः शरद पवार, सुप्रिया...

आत्याबाईला मिशा असत्या तर, यावर उत्तर द्यायचे नसतेः शरद पवार, सुप्रिया सुळे यांना सोबत घेण्यावर फडणवीसांनी थेट उत्तर टाळले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आत्याबाईला मिशा असत्या तर, यावर उत्तर द्यायचे नसते, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजप सोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. राजकारणात जर-तरला काहीच अर्थ नसतो. त्या – त्या वेळेच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागत असतात. त्यामुळे जर तर च्या प्रश्नावर मी उत्तर देत नसतो, असे देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार सोबत येण्याच्या प्रश्नावर थेट उत्तर टाळले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे भारतीय जनता पक्ष सोबत सत्तेत सामील झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार आणि खासदार देखील भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे शरद पवार हे देखील लवकरच भाजपसोबत जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. याला शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. मात्र अजित पवार जर परत आले तर भाजप नको इतर कोणीही चालेल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. असाच प्रश्न माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता

पुणे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने आमदार रवींद्र धंगेकर मैदानात उतरले आहेत. या लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments