Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे लोकसभेसाठी काँग्रेसचा 'कसबा पॅटर्न'; भाजपच्या पहिलवानाला अस्मान दाखविण्यासाठी धंगेकरांना उमेदवारी

पुणे लोकसभेसाठी काँग्रेसचा ‘कसबा पॅटर्न’; भाजपच्या पहिलवानाला अस्मान दाखविण्यासाठी धंगेकरांना उमेदवारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी अखेर काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी दिली. धंगेकर यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘कसबा पॅटर्न’ संपूर्ण शहरात राबवून हक्काचा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपच्या पहिलवान उमेदवाराला काँग्रेस अस्मान दाखविणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. (Congress announces Ravindra Dhangekar as Pune Lok Sabha candidate)

उमेदवारीसाठी शहर काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी रांग लागली होती. धंगेकर यांच्यासह माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, आबा बागूल, अभय छाजेड यांच्यासह २० जण इच्छुक होते. शहर काँग्रेसने सर्व इच्छुकांची नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविली होती.

गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी जोशी, शिंदे आणि धंगेकर यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल? याबाबत उत्सुकता होती. या स्पर्धेत उमेदवारी मिळविण्यात धंगेकरांना अखेर यश आले. पक्षाने गुरुवारी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. धंगेकर यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंग भरणार असल्याचे स्पष्ट झाले.

कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने धंगेकरांना संधी दिली. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा कसबा मतदारसंघ धंगेकर यांच्या निमित्ताने आपल्याकडे खेचून आणण्यात काँग्रेसला यश आले. त्याचा अप्रत्यक्ष फायदा धंगेकर यांनाही झाला. या पोटनिवडणुकीकडे राज्याचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. सर्व ताकद लावूनही भाजपला निवडणुकीत यश मिळविता आले नाही.

कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसबरोबरच एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस आणि फुटलेली शिवसेना होती. परंतु या सर्वांची एकत्रित ताकद आणि काम करणारा कार्यकर्ता म्हणून धंगेकर यांच्या ‘इमेज’चा फायदा झाला आणि ते विजयी झाले. मात्र गेल्या वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

पोटनिवडणुकीत शिवसेना फुटीचा पुणे शहरातील संघटनेवर फारसा परिणाम दिसला नाही.

दरम्यानच्या कालवधीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्याचा परिणाम शहर राष्ट्रवादी काँग्रेसवर झाला आहे. अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांची मोठी संख्या पुण्यात आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीतील परिस्थिती आणि आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील राजकीय परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे.

धंगेकर यांच्या उमेदवारीने ‘मोहोळ विरुद्ध धंगेकर’ अशी सरळ लढत होणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर कसब्यातील पोटनिवडणुकीप्रमाणेच लोकसभा निवडणुकीतही चमत्कार घडवून दाखविण्याची जबाबदारी धंगेकर यांच्यावर आली आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात हे येणारा काळाच सांगेल.

धंगेकर यांचा राजकीय प्रवास

पुणे महापालिका निवडणूक १९९७ मध्ये शिवसेनेकडून विजयी पुणे महापालिका निवडणूक २००२ मध्ये शिवसेनेकडून विजयी पुणे महापालिका निवडणूक २००७ मध्ये मनसेकडून विजयी पुणे महापालिका निवडणूक २०१२ मध्ये मनसेकडून विजयी पुणे महापालिका निवडणूक २०१७ मध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून विजयी कसबा विधानसभा पोटनिवडणूक २०२३ मध्ये काँग्रेसकडून विजयी

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments