इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बीड: माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. अवघ्या ११ वर्षांच्या एका चिमुरडीचा तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तासाभरात दोन वेगवेगळ्या तरुणांसोबत विवाह लावल्याचे समोर आले आहे. या दोन्ही नवरदेवांचे वय मुलीपेक्षा तिप्पट असल्याचे पाहून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी घडलेल्या या अमानवी प्रकाराने बीड शहराला हादरवून टाकले आहे. ही मुलगी पाचवी उत्तीर्ण असून लवकरच शाळा उघडणार असल्यामुळे शाळेत जाण्याची तयारी करत होती. मात्र, तिच्या पालकांनीच तिच्या भवितव्याशी खेळ केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पहिल्यांदा बीडच्या बेलखंडी येथील एका ३२ वर्षीय तरुणासोबत मुलीचा निकाह लावण्यात आला. विशेष म्हणजे, या तरुणाला आधीच दोन पत्नी असून, त्यापैकी एकीने पोटगीसाठी दावा दाखल केलेला आहे. याच पहिल्या नवरदेवाच्या एका पत्नीने या बालविवाहाची माहिती प्रशासनाला दिली.
पोलिस कारवाईसाठी येत असल्याचे कळताच, पहिल्या नवरदेवाने तातडीने पळ काढला. त्यानंतर, या चिमुरडीचा काही तासांच्या आतच गेवराई तालुक्यातील दुसऱ्या एका तरुणासोबत दुसरा विवाह लावण्यात आला. या दुसऱ्या नवरदेवाचे हे पहिलेच लग्न होते. याप्रकरणी बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी तातडीने मुलीची सुटका केली. “माझा बळजबरीने विवाह लावण्यात आला,” असे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी संतप्त नागरिक करत आहे.