इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राज्य सरकराकडून नव्या शिक्षण धोरणानुसार पहिलीपासूनच मराठी, इंग्रजीबरोबरच हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली होती. मात्र, राज्यभरातून यावर टीकेची झोड उठल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेत विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकार हिंदी भाषा लादत असल्याचा आरोप करत याला विरोध कायम ठेवला आहे. तसेच सरकराने हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील मनसे कडून देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज राज ठाकरेंच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेत यावर चर्चा केली. दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्यात जवळ-जवळ एक तास चर्चा सुरु होती.
दरम्यान, राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर दादा भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘काही महत्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे. मात्र, अजूनही त्यावर तोडगा निघू शकला नाहीये. राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्रिभाषा कशी महत्वाची आहे, हे आम्ही त्यांना सांगितले आहे. मात्र, राज ठाकरे आपल्या भूमिकेवर कायम आहेत. राज ठाकरेंसोबत आज जी चर्चा झाली, ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवणार आहोत. अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली आहे.
दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचा नजरा लागल्या होत्या. या बैठकीत ‘त्रिभाषा’ संदर्भात काही तरी तोडगा निघेल अशा चर्चा होती. मात्र, राज ठाकरे आपल्या भूमिकेवर कायम असल्याने तोडगा निघू शकला नसल्याचे आता दादा भुसे यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.