इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील काही ठिकाणांची नावं बदलण्यात यावी अशी मागणी होत आहे, काही दिवसांपूर्वीची मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनचे नाव बदलून थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली होती. आता पुण्यातील हडपसर परिसरातील मोहम्मदवाडी या भागाचे नाव बदलून ‘महादेववाडी’ करावे, अशी मागणी महायुतीच्या नेत्याने केली आहे.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी सहभागृहात या संबंधित प्रस्ताव दिला आहे. पावसाळी अधिवेशनात “पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन” अंतर्गत त्यांनी हा मुद्दा मांडण्यात आला आहे. टिळेकर यांनी विधानसभेत सांगितले की, ‘महादेववाडी’ हे नाव या भागाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भावनांशी जुळणारे आहे. 1995 मध्ये स्थानिक ग्रामस्थांनी एकमताने मोहम्मदवाडीचे नाव महादेववाडी करण्याचा ठराव केला होता. त्यानंतर 1997 मध्ये हा भाग पुणे महापालिकेत समाविष्ट झाला आणि त्यानंतर नामांतर प्रक्रियेवर विराम लागला. महापालिकेच्या नाव समितीकडे हा प्रस्ताव दिला गेला होता, मात्र नामांतराचे अधिकार महापालिकेकडे नसल्यामुळे हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. अलीकडेच, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांनी याच मागणीसाठी आंदोलन केले होते. आता आमदार टिळेकर यांनी हा मुद्दा थेट विधिमंडळात मांडल्याने या मागणीला गती मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रस्तावाला काही स्थानिक नागरिक व राजकीय पक्षांकडून विरोध करण्यात येत आहे. मोहम्मदवाडी हे नाव अनेक वर्षांपासून आहे, आणि आता नाव बदलणं योग्य नसल्याचं मत विरोधक मांडत आहेत. अशातच आता टिळेकर यांच्या या प्रस्तावावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.