इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : सोसायटी नोंदणीनंतर उपविधी पुस्तिका देण्यासाठी ३७०० रुपयांची लाच घेताना दापोडीतील उपनिबंधक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता किरपाले-चौधरी आणि मुकुंद पवार अशी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका रहिवाशाने एसीबीकडे या संदर्भात तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार आणि त्यांच्या सोसायटीतील १६ सदस्यांनी २५ मार्च रोजी सोसायटी नोंदणीसाठी दापोडीच्या उपनिबंधक कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी एका सभासदासाठी ७०० रुपयांची लाच मागितली, आणि त्यानुसार एकूण ११,२०० रुपयांची मागणी केली होती. यातील ७५०० रुपये आधीच स्वीकारले गेले होते. त्यानंतर सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले, मात्र उपविधी पुस्तिका रोखून ठेवण्यात आली.
पुस्तिका मिळवण्यासाठी तक्रारदार पुन्हा कार्यालयात गेले असता अधिकाऱ्यांनी ३७०० रुपयांची लाच मागितली, आणि त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. यानुसार शुक्रवारी सायंकाळी दापोडी कार्यालयात सापळा रचून दोघांना ३७०० रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ करत आहेत.