इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिरूर : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणांवर आजनगरपरिषदेने बुलडोजर फिरवत कारवाई केली. बंद टपऱ्या, हातगाड्या, दुकानदारांची बाहेर काढलेली शेड, बोर्ड, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली.
आज दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेली ही मोहीम संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होती. यावेळी नगरपरिषद अधीक्षक राहुल पिसाळ, बांधकाम अभियंता पंकज काकड, अतिक्रमण विभाग प्रमुख समाधान मुंगसे, अभियंता शामली लाड, स्वच्छता अभियंता आदित्य बनकर, विद्युत अभियंता तेजस शिंदे, कर निरीक्षक माधव गाजरे, दीपक कोल्हे, विजय आंधळे, मुकादम मनोज अहिरे, किरण जाधव यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. तीन जेसीबी, ट्रक व ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
मुख्याधिकारी पाटील म्हणाले, “शहरात फेरीवाला धोरण लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून हातगाडीधारक व पथारीवाल्यांना याचा फायदा होईल. मात्र आज जप्त करण्यात आलेल्या टपन्या, स्टॉल, हातगाड्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
गेल्या महिन्यापासून प्रलंबित असलेली ही कारवाई अनेक दुकानदारांना पूर्वसूचना व नोटिसा देऊनच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांचे म्हणणे ऐकून, पाहणी करून व अतिक्रमणधारकांना पूर्वीच ती काढून टाकण्याची विनंती करूनही त्यांनी ते न काढल्याने अखेर आज बुलडोजर फिरविण्यात आला. यापुढे शहरात अतिक्रमण होऊ नये, यासाठी नगरपरिषद सज्ज राहणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.