इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिरूर : शिरुर तालुक्यातील निमोणे कुऱ्हाडवाडी येथील रहिवासी शेतकरी हनुमंत साधु गरदडे वय ३३ यांना भरधाव टेम्पोने धडक देऊन गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी टेम्पो क्रमांक एमएच १६ सीडी ८०८९ वरील अज्ञात चालकाविरुद्ध शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दिनांक १८ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६:३० च्या दरम्यान शिरुर गावच्या हद्दीत पुणे-अहिल्यानगर रोडवर जान्हवी हॉटेलजवळील गोलेगाव पुलाजवळ घडली. फिर्यादी हनुमंत गरदडे हे रस्त्याच्या कडेला थांबलेले असताना, एक चॉकलेटी रंगाचा टेम्पो विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येऊन अचानक नगरकडे वळला याच टेम्पोने गरदडे यांना जोरात धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोचे चाक फिर्यादीच्या डाव्या पायावरुन गेल्यामुळे मांडीत व तळपायास गंभीर स्वरुपाचे फॅक्चर झाले. धडक दिल्यानंतर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.
त्यानंतर फिर्यादी हे जवळपास महिनाभर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यामुळे दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार विशाल कोथळकर हे करत आहेत.