इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः हॉटेल, रेस्टॉरंट्स तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हॉटेल व्यावसायिकांना शाकाहारी पदार्थ तयार करताना आणि शिजवताना पूर्णपणे स्वतंत्र व्यवस्था करणे आता बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट आणि गंभीर कायदेशीर कारवाईचा इशारा FDA च्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिला आहे.
नागरिकांनाही अन्न भेसळ किंवा अन्न सुरक्षेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्याची तक्रार करता येईल. नागरिक हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून, किंवा ‘Food Safety Connect’ App च्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतात.
FDA ने स्पष्ट केले आहे की, आता शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांची निर्मिती प्रक्रिया पूर्णपणे वेगळी असणे बंधनकारक आहे. यामध्ये पदार्थांची तयारी, शिजवणे आणि हाताळणी हे सर्व काही स्वतंत्रपणे होणे आवश्यक आहे. पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना यासंदर्भात विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
या महत्त्वपूर्ण बदलामुळे हॉटेल व्यावसायिकांना शाकाहारी आणि मांसाहारी जेवण तयार करण्याच्या पद्धतींमध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत. मागील वर्षी अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील सुमारे ३० हजार हॉटेल व्यावसायिकांना अन्न सुरक्षेबाबतचे आवश्यक प्रशिक्षण दिले होते. यंदा 1 लाख व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.