इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : हडपसर परिसरात पोलिसाला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. वाहतूक कोंडी सोडवत असताना अचानक कार पुढे घुसवून आणखी कोंडी करणाऱ्या कारचालकाला वाहतूक पोलिसांनी थांबण्यास सांगितले. याचाच राग मनात धरून कारचालक व इतर व्यक्तींनी पोलिसाला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. हा प्रकार हडपसर भागातील हांडेवाडी चौकात शनिवारी (दि. १०) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी कारचालकाला अटक केली असून इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वाहतूक पोलीस शिपाई अजिंक्य चंद्रकांत नानगुडे (वय ३४) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मारुती राजाराम माने (वय-२२, रा. गोपाळपट्टी, मांजरी) असे अटक केलेल्या कारचालकाचे नाव आहे. तर दुचाकीस्वार सोनू पाटकर (वय-२४, रा. उंड्री) व एका कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हांडेवाडी चौकात वाहतूकीचे नियमन करत होते. त्यावेळी एका कारचालकाने अचानक ट्रॅफिकमध्ये कार घुसवून ट्रॅफिक जाम केले. त्यामुळे फिर्यादी यांनी चालकास थांबण्याबाबत हाताने इशारा केला. तेव्हा त्या कारचालक मारुती मानेने पोलिसांना शिवीगाळ केली. त्यावेळी त्याची गाडी बंद करण्यासाठी चावी काढत असताना त्याने फिर्यादी यांच्या हातावर लोखंडी वस्तूने मारहाण केली.
तसेच त्यांच्या पोटात लाथ मारली. तसेच त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तींनी शिवीगाळ केली. मारुती इंटिंगाचालक व सोनु पाटकर यांच्या वाहनांवर पावती केल्याच्या रागातून त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.