इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
केडगांव :दौंड तालुक्यातील वाळकी येथील संपूर्ण दारूबंदीसाठी महिला आक्रमक झाल्या आहेत. तातडीने कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा येथील महिलांनी दिला आहे. पोलीस प्रशासनाला वेळोवेळी येथील महिलांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या राहू येथे आल्यानंतर त्यांना देखील वाळकीतील महिलांनी निवेदन देत दारू धंदे बंद करण्याची मागणी केली होती. पोलीस प्रशासनाने यावेळी तूटपुंजी कारवाई करत हात झटकले आहे.
नुकत्याच झालेल्या वाळकी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये महिलांनी हजेरी लावली. मात्र कोरम अभावी सभा तहकूब झाली. आक्रमक झालेल्या महिलांनी आडवी बाटली करण्याचा निर्धार केला आहे. पुढची ग्रामसभा चार सप्टेंबर रोजी होणार असून या सभेत आडव्या बाटलीचा ठराव करणार असल्याचे महिलांनी सांगितले. अवैध दारू विक्रीमुळे गावातील अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत. याचा त्रास महिला, शाळकरी मुला-मुलींना सहन करावा लागत आहे. यामुळे गावातील तरुण आणि महिलांनी गावातील बेकायदेशीर दारूचे अड्डे उध्वस्त करा, अवैध धंदे बंद करा अशी मागणी केली आहे. गावातून दारू कायमस्वरूपी हद्दपार करण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला.
याप्रसंगी सरपंच ज्योती थोरात, ग्रामपंचायत सदस्या मोनिका हांडे, उषा भालेराव, अंगणवाडी सेविका अंबिका शिंदे, मालन भालेराव, नंदा भालेराव, जाहिरा शेख, मनीषा थोरात, दुर्गा थोरात, जयश्री वाघमारे, राणी साळुंखे आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोरात, उपसरपंच सुरेश कदम, पोलीस पाटील निळकंठ थोरात, ग्रामसेवक एस.एस. सय्यद, जनार्धन थोरात, नाना चोरमले, दिलीप हाके, निखिल थोरात आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.
वाळकी गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून दारुमुळे अनेक महिलांचे संसार देशोधडीला लागले आहेत. मात्र पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. पोलीस प्रशासनाने व राज्य उत्पादन शुल्क विभागाने याची गंभीर दखल घ्यावी.