इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, (पुणे) टास्क पूर्ण केल्यास जादा मोबदला मिळण्याची बतावणी करून एका व्यक्तीची सायबर चोरट्याने सुमारे १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरात १२ एप्रिल ते १६ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महिला सायबर चोरट्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कदमवाकवस्ती येथील एका व्यक्तीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर, स्नेहा तिवारी यांच्यासह अनेक मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नोकरदार असून कदमवाकवस्ती परिसरात कुटुंबासह राहतात. त्यांना एका अनोळखी नंबरहून आरोपींनी फोन करून ऑनलाईन माध्यमाव्दारे जादा पैसे कमावता येईल, असे सांगून टेलीग्राम लिंकच्या माध्यमातून टास्क दिले. फिर्यादी यांना प्रथम १५०० रुपये देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या टास्कद्वारे फिर्यादी यांच्या बँकेतून तब्बल १५ लाख रुपये काढून घेतले. फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट करीत आहेत.