इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
यवत (पुणे) : डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे लहान बाळाला अपंगत्व आल्याची घटना यवत येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यवत येथील संध्या दोरगे या महिलेचे जयवंत नर्सिंग होम येथे गरोदर असल्याने उपचार चालू होते. पोट दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (दि. 18 मे) रोजी त्यांची प्रसुती होऊन त्यांनी मुलीला जन्म दिला. यावेळी डॉ. चैतन्य भट यांनी बाळाला लस द्यावी लागेल असे सांगितले. बाळाचे वजन कमी असून लस देऊ नका असे सांगूनही फक्त 700 रुपयांसाठी केडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अजित रणसिंग यांच्या मदतीने बाळाच्या उजव्या मांडीत लस दिली, उपचारानंतर चार दिवसांनी पुन्हा डॉक्टरांकडे गेले असता सूज असल्याने बाळाची मांडी बर्फाने शेका असा सल्ला दिला. परंतु सूज कमी न झाल्याने डॉ. भट यांनी बाळाला बारामती येथील डॉ. कोकरे यांच्याकडेच घेऊन जाण्यासाठी सांगितले. यानंतर डॉ. कोकरे यांनी एक्स रे काढून पुणे येथील डॉ. समीर देसाई यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला.
त्यावेळी डॉ. देसाई यांनी चिमुकल्या ओवीची तपासणी केली. आणि बाळाचे मांडीचे हाड कुजले असून तात्काळ ऑपरेशन करण्यासाठी केईएम हॉस्पिटल मध्ये दाखल करून घेतले. (दि. 22 जून) रोजी ऑपरेशन केले तेव्हापासून चिमुकल्या ओवीवर अजुनही उपचार चालू आहेत. डॉ. देसाई यांनी बाळाच्या मांडीवर चुकीच्या पद्धतीने लस दिल्याचे सांगितले. मांडीच्या हाडांमध्ये इन्फेक्शन झाले असून ओवीला अपंगत्व आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यादरम्यान, दोरगे कुटुंबीयांनी याबाबत यवत पोलिस स्टेशन येथे तक्रार देत कारवाईची मागणी केली होती. याबाबत ससून रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी यांचा अभिप्राय नुकताच प्राप्त झाला. डॉ. चैतन्य भट हे बालरोग तज्ञ नसताना देखील उपचार केल्याचे दिसत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांच्या परवानगीशिवाय बाहेरील डॉक्टर बोलवून चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने बाळाला अपंगत्व आले असल्याची फिर्याद बाळाचे आजोबा तात्याबा सोनबा दोरगे यांनी यवत पोलिस स्टेशन येथे दिली. यावरून यवत येथील डॉ. चैतन्य भट व ग्रामीण रुग्णालय केडगाव येथील डॉ. अजित प्रल्हाद रणसिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करत आहेत