इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नागपूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं आहे. 288 पैकी 230 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून कायम रहावं अशी इच्छा त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी नोंदवलं आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, सूत्रानुसार देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. अशातच आता दुसरीकडे नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
आज सकाळी नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची रामगिरी बंगल्यावरील सीएम एकनाथ शिंदे यांची नावाची पाटी काढण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाची काढलेली पाटी काही वेळातच पुन्हा लावण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी रामगिरी बंगल्यावरची पाटी काढली होती. ती अर्ध्या तासात पुन्हा लावण्यात आली. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अशा नावाची पाटी ज्या ग्रॅनाईटच्या पिल्लरवर लावण्यात आली आहे त्या पिल्लरला बंगल्याच्या मेंटेनन्सच्या कामांतर्गत पॉलिश केलं जाणार होते. त्यामुळे पॉलिश लावताना मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी खराब होऊ नये, या दृष्टीने सावधगिरी म्हणून दोन-तीन दिवसांपूर्वी ती पाटी काढून ठेवण्यात आली होती. पिल्लरला पॉलिश न होताच पाटी पुन्हा का लावली? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. कदाचित राज्यात मुख्यमंत्र्यांचा बदल झालेला नसताना मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी शासकीय बंगल्यासमोरुन काढली यावरुन राजकीय वाद होऊ नये, हे टाळण्यासाठीच असं केलं असावं, अशी चर्चा सुरु आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप 132 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनंतर सर्वाधिक जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. 57 जागा जिंकत दुस-या स्थानी असलेल्या शिवसेनेतून आता एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची मागणी होऊ लागली आहे.