इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
न्हावरे : मांडवगण फराटा परिसरातील अकरावा मैल येथे बुधवारी (ता.16) रात्री जेवणाच्या दरम्यान घरात घुसून दोन अज्ञात इसमांनी एका 19 वर्षीय तरुणावर गंभीर प्राणघातक हल्ला केला होता. त्यापैकी एक हल्लेखोराचे स्केच शिरूर पोलिसांनी संबंधित तरुणाच्या आई-वडिलांनी केलेल्या वर्णनावरून प्रसिद्ध केले. त्या स्केचच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. अशी माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.
या प्रकरणी हल्ला झालेल्या प्रज्वल पवार (वय 19) याची आई राजश्री दिगंबर पवार (वय 41, रा. अकरावा मैल-मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
बुधवारी (ता.१६) रात्री पावणे दहा वाजता राजश्री पवार, दिगंबर पवार हे दोघे पती-पत्नी मुलगा प्रज्वल पवार याच्या सोबत स्वयंपाक घरात जेवण करत असताना, अचानक दोघेजण त्यांच्या स्वयंपाक घराच्या दरवाजा जवळ आले. त्यापैकी एकाच्या हातात पिस्तुलासारखे (गन) हत्यार होते. तर दुसऱ्याच्या हातात धारदार शस्त्र होते. त्यांनी थेट दरवाजा जवळ उभे राहत पवार कुटुंबावर काही वेळ दहशत निर्माण करून, प्रज्वल पवार (वय 19) याच्या मानेला पकडून, त्याच क्षणी दुसऱ्या इसमाने धारदार शस्त्राने गळ्यावर आणि मानेवर प्राणघातक धारदार शस्त्राने वार करून, गंभीर जखमी केले होते. त्यानंतर हल्ला करून दोघे अज्ञात हल्लेखोर शेतवस्तीतून फरार झाले होते.
घडलेल्या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेबाबत अनेक तर्क-वितर्क उपस्थित केले जात आहेत. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाचे आदेश दिले होते.