इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : भवानी पेठेतील कासेवाडी झोपडपट्टीत सोमवारी (दि. १४) रात्री किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून एका तरुणाच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणातील संशयित आरोपी पसार झाला असून, त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. या हल्ल्यात सुशील अजिनाथ थोरात (वय २६, रा. भगवा चौक, कासेवाडी, भवानी पेठ) गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भरत उर्फ हरिष मोरे (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासेवाडी परिसरात सोमवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे रात्री नऊच्या सुमारास सुशील थोरात, त्याचे मित्र अनिकेत यादव, अभिजित जाधव हे गप्पा मारत उभे होते. त्या वेळी थोरात याच्या ओळखीचा आरोपी मोरे तेथे आला. त्याने थोरात याच्या खिशात हात घातला. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी मोरे याने त्याच्याकडील तीक्ष्ण शस्त्राने थोरात याच्या गळ्यावर वार केले. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.