इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील भवानी पेठेतील भारत टॉकीज परिसरात ८ ते १० जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड, बांबु, कोयते हवेत फिरवत दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना भारत टॉकीज शेजारील एम के सोडा दुकानासमोर शनिवारी (दि. १७) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मोहसीन तवकल कांबळे (वय-३७, रा. वीरभारत सोसायटी, जुना मोटार स्टँड, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून समर्थ पोलिसांनी दोघा सराईत गुंडांना अटक केली आहे.
सईद अमजद पठाण (वय-२०, रा. पत्र्याची चाळ, भवानी पेठ), दानिश आसिफ शेख (वय-१९, रा. हरमेन कॉम्प्लेक्स, भवानी पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी या दोन्ही आरोपींवर खूनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, जमावबंदीचा आदेश मोडणे, दहशत पसरविणे असे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाचा कैस रहेमान सुन्नेवाले हे दुकानात होते. त्यावेळी ८ ते १० गुंडाची टोळी हातात लाकडी बांबु, स्टीलचे रॉड, कोयते घेऊन गल्लीत आले. त्यांनी भारत टॉकीज जवळील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या मोटासायकल, फिर्यादीचा भाऊ वसीम कांबळे यांचा आयशर टॅकचा समोरील काचेवर लाकडी बांबु, दगड, स्टीलचा रॉड मारुन नुकसान केले.
फिर्यादी यांनी आरोपींना याचा जाब विचारला असता त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांच्यापैकी एकाने स्टीलचा रॉड हातात घेऊन शिवीगाळ करत जादा बोला तो तुझे छोडूंगा नही, हम यहा के भाई है, तु जादा बोला तो तुझे खतम कर दूंगा अस बोलून अंगावर धावून गेला. त्यानंतर हातातील स्टील रॉड, लाकडी बांबु हवेत फिरवून शिवीगाळ करत दहशत निर्माण करुन सर्व आरोपी पसार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.