इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातून फसवणुकीची बातमी समोर आली आहे. शेअर बाजारात भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल ५३ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिक हे टिळेकर नगर, कोंढवा येथील रहिवासी असून शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. सुमीत होमचंदानी (रा. कोंढवा) आणि कमल केवलरामाणी (रा. सूरत, गुजरात) या दोघांनी २०२२ ते २०२५ या कालावधीत त्यांच्याशी संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
आरोपींनी सुरुवातीला फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम घेतली. यानंतर बनावट संदेश पाठवून त्यांनी नफा मिळवल्याचे सांगितले. त्यानंतर काही महिन्यांनी फिर्यादी यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली. तेंव्हा त्यांना केवळ २ लाख रुपये परत करण्यात आले. उर्वरित रक्कम न देता आरोपींनी वेळकाढूपणा करत फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.