Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज बनावट टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त, एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ;...

पुण्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज बनावट टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त, एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ; कोंढवा परिसरात 3788 सिम कार्ड अन्… 32 वर्षांचा तरुण ताब्यात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कोंढव्यातील मिठानगरमध्ये दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) छापा टाकून बेकायदेशीरपणे सुरू असलेले टेलिफोन एक्स्चेंज सेंटर उद्ध्वस्त केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात घातपाती कारवायांच्या संभाव्य घटनांच्या अनुषंगाने पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. एटीएसने डीओटीचे अधिकारी व शासकीय पंचांच्या समक्ष ही कारवाई केली आहे. या ठिकाणावरून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पथकाने तब्बल ३ हजार ७८८ सीमकार्ड्ससह सीम बॉक्स, वायफाय आणि सीम बॉक्स चालवण्याकरिता लागणारा औटना तसेच लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे. नौशाद अहमद सिद्धिकी (३२, रा. कोंढवा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू समजू न देण्यासाठी बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा वापर केला जात होता. त्याकरिता या सीमकार्डचा वापर केला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कोंढवा येथील मिठानगरमध्ये असलेल्या एमए कॉम्प्लेक्स परिसरात हे बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटर चालवले जात होते. दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ताब्यात घेतलेल्या नौशादकडे कसून चौकशी सुरू केली आहे. हे टेलिफोन एक्स्चेंज सेंटर मागील किती वर्षांपासून सुरू होते, याचा शोध घेतला जात आहे. हे बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज चालवून त्याने दूरसंचार विभाग आणि भारत सरकार आणि मोबाईल कंपन्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्याने ही सीमकार्ड्स कुठून आणली? त्याला कोणत्या वितरकाने ही सीमकार्ड्स पुरवली, भारतीय यंत्रणांना विदेशातून येणारे कॉल समजू नयेत, याकरिता वापरली जाणारी यंत्रणा त्याने कशी उभी केली? त्याने याचे प्रशिक्षण कुठे घेतले ? त्याला या कामासाठी कोणी कोणी आर्थिक मदत केली? कोंढवा येथे जागा कोणी व कशी दिली? ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरुणाची पार्श्वभूमी काय आहे? याबाबत कसून तपास केला जात असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.

आगामी चार महिन्यांत मोठ्या प्रमाणावर सण आणि उत्सव असतात. त्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक असते. बाजारपेठा गजबजलेल्या असतात. सुरक्षेच्या अनुषंगाने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यापूर्वी कोंढवा भागात अनेक वेळा दहशवादविरोधी कारवाया करण्यात आलेल्या असून, अनेक दहशतवाद्यांना अटकदेखील करण्यात आलेली आहे. तसेच नुकतेच इसिसचे मॉड्यूलदेखील उघडकीस आले होते. त्या अनुषंगाने एटीएसने केलेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

एटीएसने दहशतवादी कृत्यास सहाय्य होईल, असे अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज सेंटर उद्ध्वस्त केल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना त्यांच्या परिसरात अशा प्रकारचे अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज आढळून आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा एटीएसशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments