इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात झिका बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी एकाच दिवशी सात नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सहा गर्भवती महिलांचा समावेश आहे. शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या 73 वर पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाच्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह पुणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यामुळे शहरात पुरानंतर अनेक ठिकाणी पाणी साचले. महापालिकेकडून या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, पाऊस सुरू राहिल्याने या उपाययोजनांचा फारसा फायदा होऊ शकला नाही. या साचलेल्या पाण्यामुळे डासोत्पत्ती वाढून झिकाची रुग्णसंख्या वाढली आहे.
झिका व्हायरसची लागण कशी होते?
झिका व्हायरस हा डासांमधून पसरणारा विषाणू आहे. तसेच एडीस इजिप्ती डासामुळे झिका हा रोग होतो. हा रोग एडिस डासाच्या चावण्यानं पसरतो. हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात. या व्हायरसमुळे होणारा संसर्ग अनेकदा रुग्णाच्या जीवाला धोका पसरवू शकतो. त्यामुळे झिका व्हायरसची लक्षणं दिसत असतील तर तात्काळ खबरदारी म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करा.
झिका व्हायरसची लक्षणं कोणती?
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात.