इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे पोलीस दलातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायाने पुणे शहरातील तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली. अनुष्का सुहास केदार (वय-20 वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात शिपाई पोलीस म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या पुणे ग्रामीण मुख्यालयमध्ये नेमणुकीस आहेत. दिघी- वडमुखवाडी या परिसरात राहणाऱ्या अनुष्का यांनी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चाकणकडे जाणाऱ्या पुलावरील गरुड खांबापासून इंद्रायणी नदीत उडी घेतली आहे.
दरम्यान, हे पाहताच तेथे उपस्थित असलेल्या तरुणाने देखील त्यांना वाचवण्यासाठी नदी पात्रात उडी घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अनुष्का केदार वाहून गेल्या आहेत, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे. अग्निशमन दल हे अनुष्का यांचा शोध घेत आहेत. अनुष्का यांनी त्यांच्या खासगी जीवनातील वैयक्तिक कारणामुळे असं टोकाचं पाऊल उचलल्याची भीती पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.