इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः इन्स्टाग्रामवरून महिलेशी ओळख करून तिला भेटीस बोलावणे, नशेची गोळी देऊन अश्लील फोटो काढणे आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अनुराग शर्मा (वय २३) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून, ३४ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार केली आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची अनुरागशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. ओळखीपासून मैत्रीपर्यंतची गोष्ट झाली. त्यानंतर अनुरागने महिलेचा विश्वास संपादन करून तिचा इन्स्टाग्राम आयडी आणि पासवर्ड मिळवला. त्याने महिलेचे फोटो सेव्ह केले. नंतर विवाहाची मागणी केली असता महिलेने नकार दिला. यावरून अनुरागने पैसे दिले नाही तर सेव्ह केलेले फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. पुढे तो महिलेचे आणि तिच्या पतीचे फेक खाते उघडून नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होता.
महिलेने याबाबत विचारणा केली असता, अनुरागने तिला भेटण्यास तगादा लावला. महिला भेटीस आली असता तिला नशेची गोळी देऊन तिचे अश्लील फोटो काढले. नंतर फोटो व्हायरल करणार तसेच पतीला पाठवणार अशी धमकी देत त्याने महिलेकडून खंडणी स्वरूपात पैसे मागितले. सध्या विमानतळ पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.