इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे-नगर रस्ता परिसरातील वाहतुकीचे नियोजन सुधारण्यासाठी वाहतूक विभागाने घेतलेला प्रायोगिक यू-टर्नचा निर्णय प्रत्यक्षात नागरिकांच्या अडचणी वाढवणारा ठरत आहे. रस्ता ओलांडणे नागरिकांनी प्रचंड जिकिरीचे बनत असल्याने तीव्र विरोध केला जात आहे. विविध सामाजिक संस्था व नागरिकांच्या वतीने पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. हा यू-टर्नचा प्रयोग त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत कर्तव्य जनमंचचे अध्यक्ष प्रमोद देवकर-पाटील, आझाद नागरिक मंचचे अध्यक्ष करीम शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल गलांडे यांनी पोलीस उपायुक्तांकडे हा प्रयोग बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच जर यू-टर्नचे नियोजन त्वरित रद्द केले नाही, तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रामवाडी, आगाखान पॅलेस, चंदननगर, अग्निबाज कॅम्प, खराडी, महालक्ष्मी लॉन आदी ठिकाणी ठिकाणी लागू करण्यात आलेले यू-टर्नचा प्रयोग फसलेला आहे. त्यामध्ये स्थानिक नागरिकांचा कोणताही विचार केलेला नाही. यामुळे वाहनचालक, पादचारी, वृद्ध व विद्यार्थी यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पूर्वीच्या छोट्या अंतरातील वळणे बंद करून नागरिकांना २ ते ३ किलोमीटरचे प्रदीर्घ फेरे मारायला लावले जात आहेत. या प्रायोगिक निर्णयामुळे वाहतूककोंडी कमी होण्याऐवजी ती आणखी वाढली आहे. अपघातांची संख्याही वाढली असून काही ठिकाणी अपघातात काही जण जबर जखमी झाली आहेत. पादचारी व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी रस्ते अधिक धोकादायक ठरले आहेत. या निर्णयामुळे काही वाहनचालकांना रस्त्याच्या विरुद्ध दिशेने प्रवास करण्यास भाग पडले जात असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.