इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दौंडः दौंड तालुक्यातील गावागावांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेली मोकाट कुत्र्यांची संख्या ही भविष्यात एक मोठी आरोग्य समस्या बनू शकते. जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर समस्या मोठी बनू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. यावर तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. रेबीजसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढला आहे.
नागरिकांनी असेही निदर्शनास आणून दिले आहे की, अनेक पाळीव कुत्रेही मोकाट कुत्र्यांमध्ये राहतात. अशावेळी एखादे पिसाळलेले मोकाट कुत्रे पाळीव कुत्र्याला चावल्यास, ते पाळीव कुत्रे घरातील व्यक्तीला चावण्याची शक्यता असते, ज्यामुळे गंभीर घटना घडू शकतात. दरम्यान, काही नागरिक चावा घेतल्यावर इंजेक्शन घेतात, तर काही जण दुर्लक्ष करतात, ज्यामुळे जीव गमवावा लागल्याचेही दुर्दैवी प्रकार घडले आहेत. दरम्यान, प्रशासन काही करेल का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे