इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मांडवगण फराटा : तांदळी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत घोडनदीपुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी माहिती देत सांगितले आहे की, ‘गुरुवारी (ता.१२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास काष्टी ते न्हावरे रस्त्यावरील घोडनदी पुलाजवळ हा अपघात घडला. अविनाश विठ्ठल म्हस्के (वय ३२, रा. खांबाळा, ता. मानोरा, जि. वाशीम) हे त्यांच्या एम.एच.४२ ई.४१०९ या क्रमांकाच्या दुचाकीवरून तांदळीकडे जात असताना अज्ञात वाहनचालकाने आपले वाहन भरधाव आणि हयगयीने चालवत पाठीमागून म्हस्के यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अविनाश म्हस्के यांना डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.’
या अपघातामुळे दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अज्ञात वाहनचालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी सागर नानासो गदादे (वय ३४, रा. तांदळी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अविनाश म्हस्के हा सागर गदादे यांच्याकडे शेतगडी म्हणून काम करत होता. पोलिसांनी मोटार वाहन कायद्याअंतर्गत अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा पोलीस करीत आहेत.