इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पळसदेव : इंदापूर तालुक्यातील पुर्नवसित डिकसळ गावचे मुळचे रहिवासी असलेल्या अनिल उत्तमराव काळे यांना पोलिस खात्यातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनेक वर्षापासून बारामतीत सेवा बजावलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काळे यांना स्वातंत्र्यदिनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पोलीस दलात 1991 मध्ये रुजू झालेल्या काळे यांनी बारामती उपविभागातील गुन्हे शोधपथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण या ठिकाणी काम केले. बारामती उपविभागात घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता राज्यात प्रथम तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी संजय मोहिते यांनी गुन्हे शोध पथकाची स्थापना केली. सदरच्या पथकामध्ये अनिल काळे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावत खून, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील फरारी आणि पोलिसांना आवश्यक असणाऱ्या 487 सराईत गुन्हेगारांना आपल्या सहकाऱ्यांसोबत धाडसी छापे घालून पकडण्यात यश मिळवले.
पुणे सोलापूर सातारा नगर भागात घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करून जवळपास 615 गुन्हे उघडकीस आणून तीन कोटी 79 लाख रुपयांचा ऐवज सहकाऱ्यांच्या मदतीने गुन्हेगारांकडून जप्त करून फिर्यादीना दिलासा देण्याचे काम केले आहे. पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मिळालेले मार्गदर्शन, जनतेचे सहकार्य आणि आई वडिलांचा आशीर्वाद यांचा राष्ट्रपती पदक मिळण्यासाठी मोठा वाटा असल्याची व मिळालेला पुरस्कार ही डिकसळ गावासाठी खूप अभिमानाची बाब असल्याची भावना अनिल काळे यांनी व्यक्त केली.