इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, (पुणे) : अश्लिल भाषेत फोनवरून कोणाला बोलतो अशी विचारणा करणाऱ्या प्रियसीला तरडे (ता. हवेली) येथील एका तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी 36 वर्षीय प्रेयसीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अविनाश बबन गिरी (वय-34, रा. तरडे, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हि घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल ग्रँड 77 या हॉटेलमध्ये गुरुवारी (ता. 26) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित असून त्यांना दोन मुले आहे. त्यांचे आणि अविनाश गिरी याचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. गुरुवारी दुपारी त्या कॅब करुन अविनाश गिरी याला भेटण्यासाठी निघाल्या होत्या. तेव्हा ग्रॅन्ड 77 हॉटेल बाहेर त्यांना अविनाश गिरी याची गाडी आढळून आली. म्हणून त्या हॉटेलमध्ये गेल्या. त्यावेळी तो तेथे बसून दारु पित फोनवर कोणाशी तरी अश्लिल भाषेत बोलत होता.
फिर्यादी महिलेने त्याला कोणाबरोबर असे घाणेरड्या भाषेत बोलत आहेस, असे विचारले असता त्याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तेथे असलेली प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण केली. फिर्यादी यांच्या हाताच्या अंगठ्याजवळ दुखापत झाली आहे.
दरम्यान, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतल्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अविनाश गिरी याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार करे करीत आहेत.