इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे महानगरपालिकेने काळाखडक परिसरातील शासकीय जमिनीवरील अनधिकृत झोपड्यांवर कडक कारवाई करत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली आहे. या कारवाईत सुमारे १०० हून अधिक झोपड्या पाडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-१९४९ अंतर्गत रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली. काळाखडक येथील शासकीय जमिनीवर बेकायदेशीर बांधकामे आणि झोपडपट्ट्या वाढल्याने स्थानिक नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.
पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने प्रथम नोटिसा बजावून रहिवाशांना जागा रिकामी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने जेसीबी आणि पोलिसांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. उपायुक्त (अतिक्रमण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत ही मोहीम राबवली गेली आहे. स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला विरोध दर्शवला आहे. मात्र पालिकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे.
या मोहिमेमुळे रस्ते आणि सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्या असून, पालिकेने भविष्यातही अशा कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. अतिक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे.