Friday, November 22, 2024
Homeक्राईम न्यूजकाँग्रेस बंडखोरांना २४ तासांचा अल्टिमेटम; बंडखोरांना महाविकास आघाडीत न घेण्याबाबत ठराव करणार

काँग्रेस बंडखोरांना २४ तासांचा अल्टिमेटम; बंडखोरांना महाविकास आघाडीत न घेण्याबाबत ठराव करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पर्वती, कसबा, शिवाजीनगर आणि हडपसर या चार विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीत बंडखोरी करणाऱ्यांना २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला. त्यांना नोटिसा पाठवून मविआच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, तसेच प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर या बंडखोरांबरोबर असणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांनाही कडक शब्दांत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मविआकडून काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, उबाठाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी दिली आहे.

काँग्रेसच्या बंडखोरांना पक्षाने सर्वकाही देऊनही ते उलटले असल्याचा दावा करताना शिंदे म्हणाले, मविआकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतरही पर्वती, कसबा, शिवाजीनगरमधून बंडखोरांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना आम्ही २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. त्याबाबत त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. उत्तर न आल्यास आम्ही पक्षाकडून या सर्वांच्या हकालपट्टीची मागणी करणार आहोत. तसेच पर्वती, कसबा आणि शिवाजीनगरमधील काँग्रेस पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षांची बैठक घेऊन त्यांना बंडखोरांबरोबर प्रचार करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची माहिती देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

कार्यकर्त्यांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा जर कार्यकर्ते हे बंडखोरांच्या प्रचारात दिसले, तर त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. याशिवाय त्यांना पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नाही. पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदावर बंडखोर उमेदवार मनीष आनंद यांच्या पत्नी पूजा आनंद कार्यरत आहेत. त्यांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांना कोणाचा प्रचार करणार याबाबतचा खुलासा करावा, असे सांगण्यात आले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेने (उबाठा) चे गंगाधर बधे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवून मविआत बंडखोरी केल्याचे संजय मोरे यांनी सांगितले. त्यांनाही मविआच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अन्यथा कारवाई होणार असल्याचे कळविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments