इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्तव्य बजावत असताना वाहतूक विभागातील कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने पुणे वाहतूक पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
धनाजी भरत वणवे असे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पुणे शहर वाहतूक विभागात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. बुधवारी सायंकाळच्या सुमारास पुण्यातील कात्रज मंडई चौकात ते ड्युटीवर असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमीनीवर कोसळले. आजूबाजूच्या लोकांच्या हे लक्षात येताच त्यांनी तातडीने धनाजी यांच्याकडे धाव घेतली. व त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार, धनाजी यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन आहे.
धनाजी वणवे हे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहर वाहतूक शाखेत कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा शिवराज असा परिवार आहे. धनाजी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. स्वरुप जाधव हे पोलीस शिपाई म्हणून पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत होते. स्वारगेट येथील पोलीस लाईन मध्ये ते वास्तव्यास होते. मात्र, त्यांनी अचानक गळफास लावून आत्महत्या केल्याने पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले.