इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील मोटारसायकलची चोरी करुन तो दौंड परिसरात स्वतःची मोटारसायकल असल्याचे खोटे सांगून विक्री करत होता. या प्रकरणाचा गुन्हा २६ जुलै रोजी समर्थ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यावरून, समर्थ पोलिसांनी आरोपीला सोमवार पेठेतून पाठलाग करून अटक केली असून त्याच्याकडून तब्बल १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अरविंद मोतीराम चव्हाण (वय-३९, रा. दौंड) असे या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन जवळील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ जुलै रोजी स्प्लेंडर मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणापासून तब्बल ७० ते ८० ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. पोलीस शिपाई कल्याण बोराडे आणि शरद घोरपडे यांनी दिलेल्या माहितीवरून व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा मागोवा घेत असतानाच सोमवार पेठेतील सारस्वत कॉलनी येथून पोलिसांकडे पाहून संशयितरित्या तो त्यावेळी मोटारसायकलवरुन पळून जाऊ लागला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले.
याबाबत, अरविंद चव्हाण याच्याकडे चौकशी केली असता त्याने सोमवार पेठेतील एस. व्ही. युनियन शाळेसमोरुन ही मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने चोरी केल्याची कबुली दिली. यापूर्वी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील दुचाकी वाहनांची चोरी करुन दौंड परिसरातील लोकांना ही वाहने स्वतःचीच असल्याचे खोटे सांगून मी गाड्या विकायचो असे सांगितले. दरम्यान, आरोपीकडून १० दुचाकी जप्त केल्या आहेत. बंडगार्डन आणि समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.