इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावर रस्त्याच्या बाजूलापार्किंग केलेल्या एका कंटेनरमधून 18 हजार रुपये किमतीचे तब्बल 200 लिटर डीझेल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवनेरी मिसळ परिसरात शनिवारी (ता.23) पहाटे चार ते सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी अमोल हनुमंतराव निगडे (वय 42, व्यवसाय ड्रायव्हर रा. मु. पो. गुलूचे कर्नलवाडी, ता. पुरंदर, जिल्हा पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल निगडे हे कंटेनर चालक आहेत. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवनेरी मिसळ परिसरात शनिवारी पहाटे शिवनेरी मिसळ समोर गाडी पार्किंग केली होती. सकाळी त्यांना जाग आली त्यावेळेस त्यांना डीझेलची टाकी उघडलेल्या अवस्थेत आढळून आली.
दरम्यान, डीझेलच्या टाकीतून 18 हजार रुपये किमतीचे तब्बल 200 लिटर डीझेल चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात 239/2025, भा.न्या सं. क. 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार रासकर करीत आहेत.