इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
खेड : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात झालेल्या रास्तारोको आंदोलन प्रकरणात भाजप आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासह तब्बल 32 जणांविरोधात खेड न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने हे वॉरंट निघाले असून, संबंधित सर्व नेत्यांनी याविरोधात उपजिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे.
ही घटना 2017 मधील आहे. त्या वेळी बैलगाडा शर्यत बंदीविरोधात चाकण येथे पुणे-नाशिक महामार्गावर सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन झाले होते. या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांसह बैलगाडा मालकांनी जवळपास तीन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प केली होती. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच बैल बांधल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर संबंधित नेत्यांसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यावेळी राज्य सरकारने बैलगाडा शर्यतींसाठी अध्यादेश काढला होता आणि प्राण्यांना इजा न होता शर्यती घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पेटा या सामाजिक संस्थेने या अध्यादेशाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे बैलगाडा शर्यतींना पुन्हा बंदी आली होती. याविरोधात नेते आणि बैलगाडा मालकांनी पेटा संस्थेविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन छेडले होते.
या प्रकरणी माजी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, “शासनाने राजकीय आंदोलनाशी संबंधित केसेस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आम्ही सुनावणीस उपस्थित राहिलो नाही. केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. ही आंदोलने आम्ही समाजाच्या हितासाठी केली होती. त्यात आमचा वैयक्तिक दोष नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही जाणूनबुजून काही चुकीचे केले, असा अर्थ घेऊ नये.”