इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : रेल्वे सुरक्षा दलात (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) कार्यरत असलेल्या हवालदाराने अल्पवयीन मुलीवर पाच दिवस बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी एका महिलेसह दोघांना अटक केली. रेल्वे स्थानकावर पळून आलेल्या आणखी काही मुलींवर हवालदाराने साथीदाराच्या मदतीने अत्याचार केल्याचा पोलिसांना संशय आहे.
हवालदाराने ताडीवाला रस्त्यावर रेल्वेच्या जागेत बेकायदा सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटी सुरू केल्याचेही उघडकीस आले आहे. या संस्थेत हवालदाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. अनिल पवार असे या हवालदाराचे नाव आहे.
सध्या तो पसार असून, लोहमार्ग पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सुश्मिता कसबे आणि करण राठोड यांना या गुन्ह्यात मंगळवारी (ता. ७) अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिस दलाचे अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
या गुन्ह्यात यापूर्वी कमलेश तिवारी (मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली होती. याबाबत एका अल्पवयीन मुलीने पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अत्याचार झालेली अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत होती.
तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघे मूळचे छत्तीसगडमधील असून तेथून ते पळून पुण्यात आले होते. त्यामुळे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी छत्तीसगडमधील स्थानिक पोलिस ठाण्यात दिली होती. तर मुलीच्या प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, मुलगी आणि तिचा मित्र पुणे रेल्वे स्थानकात पवार याला सापडले होते. त्याने दोघांना सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटीत नेले. त्या ठिकाणी मुलाला दुसऱ्या खोलीत ठेवून मुलीवर पवार आणि तिवारी यांनी पाच दिवस अत्याचार केला. पाचव्या दिवसांनी आरोपींनी मुलीच्या प्रियकराकडून सहा हजार रुपये घेतले व त्यांना सोडून दिले. दोघांनी हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळून आलेल्या मुलींना धमकावून पैसे उकळत
रेल्वे स्थानकात पळून आलेल्या मुलींना हेरून पवार आणि त्याचे साथीदार सोसायटीत घेऊन जायचे. तेथे त्यांना धमकावून पैसे उकळले जायचे. अल्पवयीन मुले ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याची माहिती बाल न्याय मंडळाला द्यावी लागते. मात्र तसे न करता पवार परस्पर पळून आलेल्या मुलांना या सोसायटीत डांबून ठेवायचा.
पळून आलेल्या मुली हेरण्यासाठी नेमले कामगार
पवार याने काढलेल्या सोसायटीला परवागनी देण्यात आली नसल्याचे तपासात उघडकीस आले. त्याने काही जणांना सोसायटीत कामावर ठेवले होते. पुणे रेल्वे स्थानकात पळून आलेल्या मुलींना हेरण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. त्या कामाचा मोबदला तो कामगारांना दरमहा देत.
सोसायटीची मनसेकडून तोडफोड
सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटीच्या कार्यालयाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी तोडफोड केली. मनसेचे नेते वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांनी सोसायटीच्या आवारात शिरून कार्यालयाच्या काचा फोडल्या. या गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मोरे यांनी यावेळी केली.