इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) पुन्हा एकदासर्वसामान्यांना दिलासा मिळू शकणार आहे. रिझर्व्ह बँक लवकरच व्याजदरात कपात करू शकते, अशी माहिती सध्या दिली जात आहे. अर्थतज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार एप्रिलमध्ये होणाऱ्या बैठकीत रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करू शकते. यानंतर ऑगस्टमध्ये आणखी एक कपात होण्याचा अंदाज आहे.
एका वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, बहुतेक अर्थशास्त्रज्ञांनी हाच अंदाज व्यक्त केला आहे. 18 ते 27 मार्च दरम्यान केलेल्या या सर्वेक्षणात, 60 पैकी 54 अर्थतज्ञांचा असा विश्वास आहे की, रिझर्व्ह बँक आपला बेंचमार्क रेपो दर 25 बेसिस पॉईंट्सने कमी करून 6 टक्के करू शकतो. 7 ते 9 एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीनंतर ही कपात केली जाऊ शकते. म्हणजेच रिझर्व्ह बँक 9 एप्रिल रोजी व्याजदर कपातीची घोषणा करू शकते.
फेब्रुवारीमध्ये भारतातील महागाईचा दर 3.61 टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या सात महिन्यांतील हा नीचांक आहे. या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था 6.4 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या चार वर्षांतील हा नीचांक आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला व्याजदर कमी करण्याची संधी असल्याचे म्हटले जात आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात 7 फेब्रुवारी रोजी व्याजदरात कपात केली होती.
चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्सने कपात करण्याची घोषणा केली होती. या कपातीमुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर आला आहे. एप्रिलनंतर, पुढील 25 बेसिस पॉइंट्सची कपात ऑगस्टमध्ये होऊ शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.