इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : ड्युटीवर असलेल्या एका 43 वर्षीय सिक्युरिटी गार्डचा अचानक हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावात घडली. गावातील इंटॉक्स या खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत असलेले संदीप मारोती गायकवाड यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गायकवाड हे मूळचे नांदेडचे रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या केबिनमध्ये सुरक्षा पहाणी करत असताना गायकवाड यांच्या छातीत अचानक दुखू लागले आणि ते खुर्चीवरून खाली कोसळले. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कंपनीतील कर्मचारी आणि आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
ही संपूर्ण घटना केबिनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे की, संदीप यांना अचानक त्रास होऊ लागला आणि त्यानंतर ते खाली कोसळले. दरम्यान, संदीप गायकवाड यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.