इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणातील सहा आरोपींना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या सुनावणीदरम्यान मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या बंडू आंदेकरने न्यायालयात स्वतःचा या गुन्ह्याशी संबंध नसल्याचा दावा करत भावनिक बाजू मांडली.
“आयुष हा माझा नातू आहे. मी माझ्या नातवाला का मारू? मला मारायचेच असते तर माझ्या प्रतिस्पर्ध्याला मारले असते,” असे सांगत आंदेकरने खुनातील सहभाग नाकारला.
सरकारी वकिलांनी मात्र, बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीने मिळूनच आयुषचा खून केल्याचा ठाम दावा करत सहा आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. यासोबतच, आयुषची आई कल्याणी कोमकर हिनेही आंदेकर टोळीविरोधात तक्रार दाखल केल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.
आरोपींच्या बाजूने युक्तिवाद करताना आंदेकरच्या वकिलांनी पोलिसांवर आरोप टाळून आपल्या क्लायंटला या प्रकरणात चुकीने अडकवल्याचे म्हटले. “तो माझा नातू आहे, मी का मारू? आमचा या खुनाशी काहीही संबंध नाही,” असे आंदेकरने स्पष्ट केले.
त्याने पुढे दावा केला की, “माझ्या मुलाचा खून झाल्यानंतर मी स्वतः फिर्याद दिली होती. त्यावेळी कल्याणीच्या घरच्यांना शिक्षा झाली होती. आता मात्र सूडभावनेतून आमच्या कुटुंबाला या प्रकरणात गोवले जात आहे.”
या भावनिक युक्तिवादामुळे न्यायालयीन कारवाईत नव्या चर्चेला उधाण आले असून पुढील सुनावणीपर्यंत या प्रकरणात अधिक घडामोडी होण्याची शक्यता आहे.