इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचनः “बायफसारखी संस्था देशभर कार्यरत असून 17 राज्यांमध्ये चांगला नावलौकिक मिळवला आहे. तरीही देशात अजूनही सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे. काही भाग अत्यंत विकसित आहेत, तर काही ठिकाणी आदिवासी भाग अजूनही अत्यंत मागासलेले आहेत. जीवनावश्यक सुविधा, शिक्षण, आरोग्य यांचा तुटवडा तिथे कायम आहे. ही विषमता दूर झाली पाहिजे,” असे मत सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचा 59 वा वर्धापनदिन रविवारी (ता. 24) उरुळी कांचन येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. आमटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय चारा संशोधन संस्थेचे संचालक डॉ. पंकज कौशल, बायफचे अध्यक्ष ऋषिकेश मफतलाल, डॉ. मंदा आपटे, सीएसआरचे प्रमुख योगेश कापसे, डॉ. भरत काकडे, गिरीश सोहनी, सुनील लालभाई, डॉ. अशोक पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. डॉ. मणिभाई देसाई उत्कृष्ट सादरीकरण, गुणवंत कामगार, उत्कृष्ट प्रकाशन, ग्लोबल सेवा तसेच बचत गटांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
आपले विचार मांडताना डॉ. आमटे म्हणाले, “बाबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला. त्याच मार्गावर आम्ही काम करतोय. आदिवासी लोकांचा विश्वास जिंकला आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी शेतीचे धडे दिले. आजही देशात असे भाग आहेत जिथे मूलभूत गरजा नाहीत. शिक्षण हा त्यांचा हक्क आहे. म्हणून आम्ही त्यावर भर दिला. कृषी क्षेत्रात सातत्याने काम सुरू ठेवल्यामुळे आदिवासी समाजामध्ये सकारात्मक बदल होत आहेत. समाजाचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि आता पुढची पिढीही हे कार्य पुढे नेत आहे.”
राष्ट्रीय चारा संशोधन संस्थेचे संचालक डॉ. पंकज कौशल यांनी माहिती दिली की, “गेल्या काही वर्षात 40 पेक्षा जास्त चारा जातींवर संशोधन केले असून त्यातून 439 जाती शोधण्यात आल्या आहेत. एका जातीसाठी किमान 10 ते 12 वर्षे संशोधन करावे लागते. यामुळे मागील 15 वर्षांत देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात 50 हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढले असून सुक्या चाऱ्याचे प्रमाण घटले आहे. पुढील वर्षी सीड हायब्रीड नेपिअर हे नवीन चारा पीक शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.
बायफचे अध्यक्ष ऋषिकेश मफतलाल यांनी भाषणात सांगितले की, “गेल्या 20 ते 25 वर्षांत देशात मोठी प्रगती झाली आहे. मात्र विषमता अजूनही कायम आहे. बायफ ही संस्था त्या दिशेने काम करत आहे. प्रगती झाली तरीही गावांची संस्कृती टिकवणे महत्त्वाचे आहे. भौतिक विकासामध्ये कितीही बदल झाले तरी आमटे कुटुंब हे खरे हिरो आहेत. त्यांनी संस्कृती जपत आदिवासी भागात सेवा केली आहे, हे समाजासाठी प्रेरणादायी आहे.