इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन, (पुणे): पुणे-सोलापूर महामार्गावर अचानकडुक्कर आडवे गेल्याने पोलीस उपनिरीक्षकाचे (psi) चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर आज शुक्रवारी (ता. 22) पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
महेश अंबादास गळगटे (वय-36, रा. राममंदिर लेन, आष्टी, जि. बीड) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे, त्यांच्यावर लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश गळगटे हे बार्शी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या पदावर कार्यरत आहेत. कामानिमित्त आपली चारचाकी गाडी घेऊन जात होते. आज शुक्रवारी पहाटे पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी सोरतापवाडी हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर आले असता अचानक डुक्कर आडवे गेल्याने हा अपघात घडला.
दरम्यान, डुक्कर आडवे आल्याने ते चालवत असलेल्या चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी थेट महामार्गावरील दुभाजक तोडून पुण्याच्या बाजूकडे निघालेल्या ट्रकला धडकली. या अपघातात गळगटे यांना गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, सदर अपघाताची माहिती मिळताच कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने गळगटे यांना गाडीच्या बाहेर काढून लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.