इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः शहरातील खराडी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकावर हॉटेल चालकाकडून कारवाईच्या धाकाने पैसे उकळल्याचा आरोप समोर आला आहे. नियमानुसार हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असताना, संबंधित अधिकाऱ्याने रात्री सव्वा बारा वाजता हॉटेलमध्ये घुसून जेवण करत असलेल्या ग्राहकाचे मोबाईलवर चित्रीकरण केले.
दुसऱ्या दिवशी हॉटेल व्यावसायिकाला पोलिस ठाण्यात बोलावून “तुम्ही माझे काम केले तर मी तुमचे काम करतो” असे सांगत पैशांची मागणी केली. सायंकाळी साडेआठच्या सुमारास पैसे स्वीकारतानाचा प्रकारही उघड झाला आहे. संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या प्रकरणाबाबत खराडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले की, हॉटेल-रेस्टॉरंटला दीड वाजेपर्यंत परवानगी आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला हॉटेल बंद करण्याचे कोणतेही निर्देश दिले नव्हते. तर दुसरीकडे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नियमावलीनुसार, अपवादात्मक परिस्थिती वगळता पोलिसांनी ग्राहकांना त्रास न देता, कारवाई आवश्यक असल्यास मॅनेजरला बाहेर बोलावून वेळेच्या मर्यादनंतरच कारवाई करावी, असे स्पष्ट नमूद आहे.
पोलिसांच्या वर्तनामुळे हॉटेल व्यावसायिकांत असंतोष व्यक्त होत असून, केवळ कारवाईच्या भीतीने पैशे उकळणे हे पोलिस दलाच्या प्रतिमेला शोभणारे नसल्याची चर्चा सुरू आहे.