इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात शोले स्टाईलने आंदोलन करून एका तरुणाने सगळ्याचे लक्ष वेधले. पण तरुण पाण्याच्या टाकीवर नाही तर थेट टॉवरवर चढला. या घटनेने परिसरात काही वेळासाठी खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत तरुणाला टॉवरवरून खाली उतरवले. मात्र, यावेळी पोलिसांची चांगलीच दमछाक उडाली.
अमोल रामदास धोत्रे (वय वर्ष ३२, रा. वाघोली), असं या तरुणाचं नाव असून, या तरुणाने गावात मोठा गोधळ घातला. ‘आम्ही गावरान जागेत राहतो. आम्हाला आमची जागा नावावर करून पाहिजे आहे. या मागणीसाठी तरुण टॉवरवर चढला असल्याचे समोर येत आहे. आपण महसुलमंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी हे सर्व केल्याचं तरुणाने सांगितलं.
तरुण जेव्हा गावातील एका टॉवरवर चढला होता. तेव्हा त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. यामुळे काहीवेळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि तरुणाला खाली येण्यासाठी विनंती केली. मात्र, तरूणानं त्यांचे ऐकले नाही. काही वेळानंतर तो खाली आला. तरूणाला पोलिसांनी ठाण्यात नेण्यात आले. नंतर काही वेळानंतर तरुणाला सोडून दिले. मात्र, सोडून दिल्यानंतर तरुण पुन्हा टॉवरवर चढला. पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी धाव घेत त्याला खाली उतरवले. सुमारे २ ते ३ तास हा सर्व प्रकार सुरू होता. दुसऱ्यांदा तरूण वर गेल्यानंतर त्याला खाली उतरवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक उडाली.
दरम्यान, तरुण खाली आल्यानंतर ‘आमची जागा आमच्या नावावर करून द्या, नाही तर, मी मंत्रालयाच्या टॉवरवर चढेन..’, असा थेट इशाराच त्याने दिला.