इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
केसनंद (हवेली): जमिनीच्या वादातून हवेली तालुक्यातील केसनंद येथे एका व्यक्तीवर गावठी पिस्तुलाने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी (३१ जुलै) रात्री ९:३० च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सुशील ढोरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोक्का गुन्ह्यातील जामिनावर सुटलेला आरोपी सचिन राजाराम ढोरे व त्याचे साथीदार भिवराज हरगुडे आणि गणेश जाधव या तिघांनी मिळून हा हल्ला केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमके प्रकरण काय?
जमिनीच्या वादातून हवेली तालुक्यातील केसनंद येथे एका व्यक्तीवर गावठी पिस्तुलाने गोळीबार करण्यात आला असून हल्ल्यात सुशील ढोरे यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी सचिन ढोरे आणि भिवराज हरगुडे यांना अटक केली आहे. मात्र, तिसरा आरोपी गणेश जाधव हा अद्याप फरार आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे पुढील तपास करत आहेत.