इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. वृद्ध आई-वडिलांच्या देखभालीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना महिनाभर पगारी सुट्टी देण्यात येणार असून, या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्राच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत (25 जुलै 2025) याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले केंद्रीय सिव्हिल सेवा (रजा) नियम, 1972 अंतर्गत कर्मचाऱ्यांना आता दरवर्षी 30 दिवसांची अर्जित रजा, 20 दिवसांची अर्धवेतन रजा, 8 दिवसांची आकस्मिक रजा आणि 2 दिवसांची प्रतिबंधित रजा मिळणार आहे. ही रजा वृद्ध पालकांच्या देखभालीसह वैयक्तिक कारणांसाठी घेता येणार आहे.
याबाबत बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं की, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल राखता यावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. सरकारने ही रजा वैयक्तिक कारणांसाठी दिली आहे. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याला कौटुंबिक जबाबदाऱ्या, आरोग्यविषयक कारणे किंवा अन्य कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी गरज भासल्यास तो या सुट्ट्या घेऊ शकतो. या रजा ‘पगारी’ असल्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.