इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहेत. विजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेवर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील ब्रेमेन चौकाजवळ ही घटना घडली. औंध परिसरात असणाऱ्या एमएसईबीच्या डीपीचा झटका लागून मृत्यू तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एक रिक्षाचालक होता तर दुसरा नोकरदार. विनोद चिंतामण क्षीरसागर (वय २९ वर्षे) आणि सौरभ विजय निकाळजे (वय २७ वर्षे) अशी मृतांची नावं आहेत.
कसा घडला अपघात ?
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील औंध भागातील ब्रेमेन चौक येथील सार्वजनिक शौचालयाजवळ एमएसईबीची डीपी आहे. याठिकाणी दोन व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिस याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दोघेही तरुण बेशुद्धावस्थेत पडले होते. पोलिसांनी तात्काळ एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं आणि विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितला.
त्यानंतर पोलिस आणि एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही तरुणांना बाजूला काढले. त्यानंतर दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला असल्याचे समजले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. नंतर दोघांच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना दिली. दरम्यान, या घटनेबाबत चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.