इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : विहीर चोरीला गेली… मकरंद अनासपुरेंचा हा चित्रपट आपण सगळ्यांनीचं पहिला आहे. यात विहीर चोरीला गेली म्हणून अनासपुरे कोर्टात जातात व सिद्ध देखील करतात तसेच त्याची भरपाई देखील घेतात. पण हे चित्रपटांपुरते ठीक आहे खऱ्या आयुष्यात अशा गोष्टी कमीच पहायला मिळतात. पण… पुणे तिथे काय उणे… पुण्यात तर चक्क घर चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील मंचर येथे राहणाऱ्या 80 वर्षीय महिलेचं घर चोरीला गेले आहे. शकुंतला शिवाजी बागल असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. शकुंतला या आपल्या मुलीकडे पुण्याला उपचारासाठी गेल्या होत्या. काही दिवसांनी त्या आपल्या घरी परत निघाल्या मात्र, घरी येताच त्यांना धक्का बसला. त्याचं घर जागेवरूनच गायब झालं. महिलेने याची तक्रार पोलिसात दिली असून, लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी महिलेने केली आहे.
शकुंतला या 1964 सालापासून त्या घरात राहत होत्या त्यांनी आत्तापर्यंत नगर पंचायतीला घरपट्टीही दिली आहे. शकुंतला यांना पाच मुलं होती. मात्र, चार मुलांचं निधन झाल्यानंतर व पतीच्याही निधनानंतर त्या एकट्या त्या घरात राहत होत्या. अचानक घर गायब झाल्याने, 80 वर्षीय वृद्ध महिलेवर आता बेघर होण्याची वेळी आली आहे.
मंचर पोलिसांनी महिलेकडून घर चोरीला गेल्याचा तक्रार अर्ज न घेता, सदर वृद्ध महिलेकडून संशयितांची नावे टाकून कोणीतरी आपले घर पाडल्याचा अर्ज लिहून घेतलाय. या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत.