इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई: मुंबईतील सांताक्रूझ येथे एका चार्टर्ड अकाउंटंटने ब्लॅकमेलिंगला कंटाळून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. राज मोरे (वय ३२) नावाच्या या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली असून, त्याच्या सुसाइड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल परवानी आणि साबा कुरेशी हे दोन जण गेल्या १८ महिन्यांपासून राजला ब्लॅकमेल केले होते. राजचा एक खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन, आरोपींनी त्याच्याकडून तब्बल ३ कोटींहून अधिक रकमेची खंडणी उकळली होती. इतकंच नाही, तर त्यांनी राजची एक महागडी कारही जबरदस्तीने हिसकावून घेतली.
राजने सुसाइड नोटमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की, “माझं जीवन संपवण्यासाठी राहुल परवानी आणि साबा कुरेशी जबाबदार आहेत.” त्याने आपल्या आईची माफी मागितली आहे आणि कंपनीतील सहकाऱ्यांना केलेल्या घोटाळयाविषयी काही माहित नसून ते निर्दोष आहेत असे म्हंटले आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि खंडणी उकळणे या गंभीर आरोपांखाली राहुल परवानी आणि साबा कुरेशी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६, ३८४, ५०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज खूप तणावाखाली होता, पण त्याने कधीच याबाबत काही सांगितले नाही, अशी खंत राजच्या आईने व्यक्त केली आहे. दरम्यान, राजने केलेल्या आत्महत्येमुळे कुटुंबात हळहळ व्यक्त केली जात आहे.