इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः इंजिनिअरिंगच्या परीक्षेत सलग तीन वेळा अपयश आल्यानंतर नैराश्यात सापडलेल्या एका तरुणाने पुण्यातील राजाराम पुलावरून मुठा नदीपात्रात उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (४ जुलै) संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर तरुण पुण्यातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. शिक्षणात सलग अपयश येत असल्याने तो मानसिक तणावात होता. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.
राजाराम पुलावरून नदीत उडी घेताच परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने पोलिस व पुणे अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने अवघ्या काही मिनिटांत धाव घेत तत्काळ बचावकार्य सुरू केले. जवानांनी तात्काळ नदीपात्रात उतरून या तरुणाला बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले.