इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : हिंजवडी आयटी पार्क सुरुवातीपासूनच वाहतूककोंडीमुळे चर्चेत आहे. रोजच्या वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. मात्र, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. लवकरच हिंजवडी मेट्रो सुरु होणार असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRDA ने मेट्रोच्या एका मार्गावर लवकरच सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. यावर्षी सप्टेंबरपर्यंत २३ किमीच्या मेट्रो लाईन ३ पैकी १३ किलोमीटरचा मार्ग (मेगापोलिस सर्कल ते बालेवाडी फाटा) सुरू करण्याचं नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मेट्रो लाईन ३ ही २३.३ किमी लांबीची आहे, या मार्गावर २३ मेट्रो स्थानके आहेत. यापैकी १३ किमीचा मेट्रो मार्ग सुरू करण्यात येणार आहे.
नोव्हेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. PMRDA आणि टाटा ग्रुप व सिमेन्स यांच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो द्वारे सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत विकसित केला जात आहे.
दरम्यान, हिंजवडीत वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वात जास्त पावसाळ्यात निर्माण होतो. पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. यामुळे अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता मेट्रो लवकरच सुरु होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.