इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
भोर तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतीत ग्रामसेवक विजय कुलकर्णी यांचा शोध घेत आलेल्या एका व्यक्तीने गोंधळ घालून महिला कर्मचाऱ्यांना प्रश्नांचा भडिमार केला,, टेबलाची काच फोडून कार्यालयात तोडफोड केली आणि “मी प्रहार संघटनेचा माणूस आहे, काहीही करू शकतो” अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (७ जुलै २०२५) दुपारी आरोपी हनुमंत मंगेश शिंदे (रा. देगाव नायगाव, ता. भोर) ग्रामपंचायतीत आला. त्यावेळी दोन महिला कर्मचारी कार्यालयात हजर होत्या. आरोपीने मोठ्याने विचारले, “तुमचे ग्रामसेवक विजय कुलकर्णी कुठे आहेत?” त्यावर महिलांनी सांगितले की, ते काही कारणास्तव ससेवाडी येथे गेले आहेत.
यावर संतप्त झालेल्या आरोपीने महिला कर्मचाऱ्यांना विचारले, “नसरापूरमध्ये रावसाहेब (ग्रामसेवक) कधी असतात? ते काय काम करतात?” असे प्रश्न करत त्यांना अडचणीत टाकले.
यानंतर रागाच्या भरात आरोपीने ग्रामसेवकाच्या टेबलावरील काच उचलून जमिनीवर आपटून फोडली व थोडीशी तोडफोड केली. यावेळी कर्मचारी रुपेश रवींद्र ओहाळ यांनी शांत राहण्याचे आवाहन केले असता, आरोपीने मोठ्याने ओरडत शिवीगाळ केली व म्हणाला, “मी प्रहार संघटनेचा माणूस आहे, काहीही करू शकतो, हे लक्षात ठेवा. तुम्हाला काम करून देणार नाही.”
या प्रकारामुळे ग्रामपंचायतीत काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.